दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

राजधानी मुंबई

मुंबई : राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि तीन दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरले. यामुळे 29 कोटी 67 लक्ष 60 हजार इतका वाढीव बोजा पडेल. सेंट्रल मार्ड संघटनेने निवासी डॉक्टर 24 तास सेवा देत असल्याचे निदर्शनास आणले आहे. राज्यात कोरोनामुळे निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवा देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या महाराष्ट्रात प्रतिमहा 54 हजार, गुजरात मध्ये 63 हजार, बिहारमध्ये 65 हजार आणि उत्तर प्रदेशात 78 हजार एवढे विद्यावेतन देण्यात येते. महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांना विद्यावेतनात वाढ केल्याचा निर्णय झाल्यामुळे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी यांचे सुधारित विद्यावेतन 64 हजार 551 पासून 71 हजार 247 रुपयांपर्यंत होईल. तसेच, दंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सुधारित विद्यावेतन 49 हजार 648 पासून 55 हजार 258 इतके होईल.
लाभार्थींना मोफत एक किलो चणाडाळ
प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्ख्या चण्याऐवजी प्रतिमहिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यात अख्ख्या चण्याऐवजी डाळ घेण्यास अधिक पसंती असल्याचे निदर्शनास आले असून अनेक लोकप्रतिनिधीनी यासंदर्भात विनंती केली आहे. यास्तव हा निर्णय घेण्यात आला. सदर चणाडाळ विक्री करण्याकरिता दुकानदारांना 1 रुपया 50 पैसे प्रतिकिलो एवढे मार्जिन देण्यात येईल. या डाळ वितरण योजनेकरिता एकूण 73 कोटी 37 लाख इतका वित्तीय भार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *