Home राजधानी मुंबई व्हीजे-एनटी मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत बैठक

व्हीजे-एनटी मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत बैठक

81

मुंबई : कोविड पार्श्वभूमीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत खासदार शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मागासवर्ग, बहुजन समाज कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा – वसतिगृह संचालक संघाचे निमंत्रक लक्ष्मण माने यांनी भेट घेत समस्या मांडल्या.
आश्रमशाळांतील मूळ अडचण म्हणजे ही मुले दुर्गम डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्या व तांड्यावरची असून त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांना आॅनलाईन शिक्षण देणे कठीण आहे. शासनाच्या आदेशानुसार सध्या सर्व शाळा बंद आहेत. तसेच, या समाजातील मुलांकडे अँड्रॉईड फोन नसल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. आश्रमशाळांतील सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉईड मोबाईल फोन पुरवण्यात येण्यासंबंधात सरकारकडून काय उपाययोजना करता येईल यासंदर्भात चर्चा झाली.
सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र करावा ही प्रमुख मागणीही नोंदवण्यात आली. त्याचबरोबर विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणा, थकित वेतन, शिक्षक भरती, परिपोषण अनुदान यासंदर्भातील मागण्या शरद पवार व मंत्री महोदय यांच्यासमोर अधोरेखित करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा वसतिगृह संचालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.