Home उपराजधानी नागपूर रेशीम कोश उत्पादनातून रोजगार निर्मितीला चालना

रेशीम कोश उत्पादनातून रोजगार निर्मितीला चालना

109

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविताना त्यांना रेशीम शेतीकडे वळवून रेशीम कोशवाढीची उत्पादनक्षमता वाढवा. त्या रेशीम कोश उत्पादनातून स्थानिक रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.                                              वस्त्रोद्योग आयुक्तालय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. वस्त्रोद्योग आयुक्त माधवी खोडे-चवरे, रेशीम संचालक श्रीमती भाग्यश्री बानायत उपस्थित होत्या.                                       विदर्भात रेशीम उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळवण्याबाबत रेशीम संचालनालयाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत उत्पादित रेशीम कोश स्थानिक ठिकाणी खरेदीची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.                                          हातमाग आणि यंत्रमागाचा आढावा घेत त्यांनी रेशीम उत्पादनासोबतच राज्यातील सूतगिरण्या सौरऊर्जेवर चालविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे सूतगिरणी चालकांचा वीज बिलावर होणारा खर्च वाचून उत्पादनवाढीस मदत होईल. सौरऊर्जेवर जास्तीत जास्त सूतगिरण्या चालवून राज्य शासनाचा विजेवर होणारा खर्च वाचविणे गरजेचे असल्याचे मंत्री पाटील यड्रावकर म्हणाले. तसेच, सूतगिरणीत खासगी गुंतवणूकदारांना थेट अनुदान तसेच विभागातील मागासवर्गीय सूतगिरण्यांचाही त्यांनी आढावा घेतला. बंद सूतगिरण्यांबाबत विभागाने लवकरात लवकर निर्णय घेत वस्त्रोद्योग विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांनी रेशीम कोश खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत मागणी केली आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा उपलब्ध करुन दिल्यास नियोजित विशिष्ट दिवशी कोश खरेदी करता येईल. शेतकरी व व्यावसायिक यांना त्याचा फायदा होईल, याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.