Home उपराजधानी नागपूर नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : डॉ.नितीन राऊत

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : डॉ.नितीन राऊत

93

नागपूर : सध्या कोविड-19 या वैश्विक महामारीशी संपूर्ण जग लढा देत आहे. नागरिकांचे आरोग्य हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोना मुक्तीबाबत नागपूर पॅटर्न विकसित करून तो यशस्वीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. [niteen raut@ independance] भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या सभापती शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त मनपा आयुक्त जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, माजी खासदार गेव्ह आवारी, वरिष्ठ पोलिस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिल्याचे सांगत महाराष्ट्र देशातील प्रगतशील राज्य असून, राज्याच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाचा कोरोना मुक्तीवर अधिक भर आहे. कोरोना मुक्तीसोबतच उद्योग व्यवसाय, शिक्षण व रोजगाराला चालना देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून, गेल्या साडेचार महिन्यांपासून आपणही त्याच्याशी लढा देत आहोत. अचानक उद्भवलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण जोरकस प्रयत्न करत असल्याचे सांगून श्री. राऊत यांनी राज्य सरकार या दिशेने भक्कमपणे पावले टाकीत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पारिचारिका आदी जिवाची पराकाष्ठा करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नागपूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी चांगले प्रयत्न केले असून, आॅक्सिजन व व्हेंटीलेटर बेड्ससोबतच मुंबई, पुण्याच्या धर्तीवर जम्बो हॉस्पिटलच्या उभारणीबाबत प्रशासनाने पडताळणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे व सहा. उपनिरीक्षक संदीप शर्मा यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. (महासंवाद)