Home राजधानी मुंबई पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन

पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन

57

वॉशिंग्टन : भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचे सोमवारी अमेरिकेतील न्यूजर्सीत निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत जगतावर शोककळा पसरली आहे.
पंडित जसराज यांचे न्यूजर्सीत शिष्य आणि परिवारासमवेत वास्तव्य होते. सोमवारी सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 रोजी हरियाणा राज्यात झाला. झाला. चार वर्षांचे असताना वडिल पंडित मोतीराम यांचे निधन झाले. त्यानंतर मोठे भाऊ पंडित मणिराम यांनी त्यांचे पालनपोषण केले. लहान वयात तपस्या करून त्यांनी गाण्यावर प्रभूत्व मिळवले. दरम्यान, पंडित जसराज यांना 2000 साली पद्मविभूषण सन्मान देण्यात आला होता. याशिवाय संगीत नाटक अकादमीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ पंडितजराज असे नाव दिले आहे. भारताबरोबरच जगभरात पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. अमेरिका आणि कॅनडातही अनेक वर्षं त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे कित्येकांना दिले आहेत.
महाराष्ट्राशी नाते
जसराज यांचे महाराष्ट्राशी अधिक ऋणानुबंध होते. त्यांची पत्नी मधुरा ह्या चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या कन्या असून त्यांचा विवाह 1962 मध्ये झाला. पंडित जसराज यांनी मराठी गीतेही गायली आहेत.
पंडितजी जुगलबंदीसाठी स्वर्गस्थ झालेत : मुख्यमंत्री
मुंबई : पंडित जसराज नावाचा तारा संगीत क्षेत्रातून निखळला आहे यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात जणू अंध:कार पसरला आहे. स्वर्गीय संगीताचा आनंद पंडितजींनी या भूतलावरील प्रत्येक कणाकणांना दिला. आता ते जुगलबंदीसाठी स्वर्गस्थ झाले आहेत, अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पंडितजी हे गायक म्हणून जितके थोर होते, तितकेच मनुष्य म्हणूनही महान होते. त्यांच्या चेहºयावरील प्रसन्नता, हास्य हे त्यांच्या गळ्यातून निघणाºया सुरांइतकेच दिलखुलास होते. पृथ्वीवरील सातही महाद्विपांवर सुरांची बरसात करणारे ते एकमेव गायक होते. पंडितजी जुगलबंदीचे बादशहाच होते. जिथे जिथे सूर्याची किरणे पोहोचत होती तेथे तेथे पंडितजींचे सूर पोहचले होते, अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
भारतीय शास्त्रीय संगीत नि:शब्द झालंय : उपमुख्यमंत्री
मुंबई : महान शास्त्रीय गायक, पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाने भारतीय संगीत नि:शब्द झाले आहे. ऐंशी वर्षांहून अधिक काळ रसिकांना मंत्रमुग्ध करणारा स्वर शांत झाला आहे. जसराज यांनी भारतीय संगीत समृद्ध केले. देशविदेशात लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचे ध्वनिमुद्रीत गायन, संगीत अनेक पिढ्यांना शास्त्रीय संगीताचा आनंद देत राहील. त्यांचा स्वर आणि आकाशमंडलातील ताºयाला दिलेले नाव यामुळे ते अनंतकाळ रसिकांच्या स्मरणात राहतील,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here