Home राजधानी मुंबई मोठा निर्णय, एसटी महामंडळ पेट्रोलपंप सुरू करणार

मोठा निर्णय, एसटी महामंडळ पेट्रोलपंप सुरू करणार

180

मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून लवकरच सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप [petrol pump by st mahamandal] सुरू करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तसेच, महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.
सह्याद्री येथे मंगळवारी परिवहन मंत्री अ‍ॅड. परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ आणि इंडियन आॅईल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि पाच ठिकाणी एलएनजी पंप सुरू करण्यात येतील. सदर पेट्रोल-डिझेलपंप/ एलएनजी पंप इंडियन आॅईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
यासंदर्भात मंत्री परब यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या प्रवासी तिकिटांतून मिळणाºया हजारो कोटीच्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. आता राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर इंडियन आॅईलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी इंधन पंप उभारले जाणार आहेत. या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत निर्माण होईल. बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच वरिष्ठ अधिकारी, इंडियन आॅईलचे महाराष्ट्र प्रमुख अमिताभ अखवैरी, महाव्यवस्थापक राजेश जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (महासंवाद)