६५ वर्षावरील कलाकारांना चित्रीकरणास परवानगी

(Last Updated On: August 20, 2020)

मुंबई :  चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरू करण्याकरिता मार्गदर्शक सूचना 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती. तथापि, उच्च न्यायालयाने सदरील अट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने आता ६५ वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहील, अशीही माहिती श्री. देशमुख यांनी दिली आहे. या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी उद्योगक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी व्यक्त केली आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *