चंदन वृक्ष लागवडीसंबंधी सरकारचा मोठा निर्णय

(Last Updated On: August 20, 2020)

मुंबई : चंदन वृक्षतोड, वाहतूक व विपणनाच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील. त्यासाठी कायद्यात व नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, असे प्रतिपादन वनमंत्री संजय राठोड यांनी केले. चंदन वृक्ष लागवड, वृक्षतोड, वाहतूक आणि विल्हेवाटबाबत आयोजित वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस होतो. कधी दुष्काळ तर कधी पूर परिस्थिती असते. अशावेळी चंदन वृक्ष लागवड निश्चित वरदान ठरू शकते. शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. कन्या वनसमृद्धी योजनेच्या माध्यमातून जन्म झालेल्या मुलीच्या नावाने 10 रोपे लागवड करावयाची आहेत. त्यात चंदनाची लागवड करता येईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या शेताच्या बांधावर व शेतजमिनीवर सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येतो. याअंतर्गत चंदनवृक्षासह 31 प्रजातींची वृक्षलागवड करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.
मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) एफडीसीएम लिमिटेड नागपूर एम. श्रीनिवास राव यांनी भारतातील मुख्य चंदन उत्पादक राज्यांमधील तरतुदींविषयी माहिती दिली. आयडब्ल्यूएसटी बंगलोरचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राज यांनी चंदन लागवडीविषयक तांत्रिक बाबीविषयक सादरीकरण केले. नागपूर येथील वनसंरक्षक (वन विनियमन) एस. एस. दहिवले यांनी चंदन तोड व वाहतुकीविषयक सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
चंदन वृक्ष लागवड केलेले व लागवड करण्यास इच्छुक असलेले शेतकरी, चंदनाचे वापर करणारे उद्योजक, राज्यातील वन अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. राज्यातील सर्व भागातून सहभागी शेतकरी व उद्योजकांनी शंका व सूचना सविस्तर मांडल्या. यानंतर अधिकाºयांनी सर्व शंकाचे निरसन केले.
यावेळी विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) मोहन कर्नाट आदी उपस्थित होते. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *