विद्यार्थ्यांपुढे मोठ्या अडचणी, एनसीआरटीचा अहवाल

(Last Updated On: August 22, 2020)

नवी दिल्ली : कोरोना काळात आॅनलाईन शिक्षणाचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात देशभरात 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन,संगणक किंवा लॅपटॉप अशी कुठलीही सुविधा नसल्याचे आढळून आले आहे. शिवाय 28 टक्के विद्यार्थी आणि पालकांसमोर विजेची समस्या आ वासून उभी आहे. एनसीआरटी अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने यासंबंधी सर्वेक्षण केले आहे.
देशातील केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सीबीएसईशी संबंधित शाळांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तसेच प्राचार्यांसह एकूण 34 हजार लोकांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. देशातील शिक्षणक्षेत्रावर मोठे संकट उभे ठाकले असून प्रभावी शैक्षणिक उद्देशप्राप्तीसाठी उपकरणांचा वापर करण्याच्या माहितीचा अभाव तसेच शिक्षकांना आॅनलाईन शिक्षणाच्या पद्धतीची पूर्ण माहिती नसल्याचे शिकवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. एनसीईआरटीनुसार, जवळपास 27 टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नसल्याचे सांगितले आहे. कोरोना काळात शिक्षणासाठी बहुतांश विद्यार्थी हे मोबाईल फोनचा वापर करत आहेत; परंतु ज्यांच्याकडे दोन्हीपैकी काहीच नाही, अशा विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जवळपास 36 टक्के विद्यार्थी पाठ्यपुस्तक आणि त्यांच्या जवळ असलेल्या पुस्तकांचा वापर करून अभ्यास करत आहेत. शिक्षक आणि प्राचार्यांकडे लॅपटॉप हे माध्यम दुसºया क्रमांकावर असून ते शिक्षणासाठी वापरत आहेत. या संपूर्ण घडामोडीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगला संवाद होत नसल्याचे दिसून आले आहे.
सोप्प नाहीच…
जवळपास 50 टक्के विद्यार्थ्यांकडे पुस्तके उपलब्ध नाहीत. एनसीईआरटीचे संकेतस्थळ आणि दीक्षा पोर्टलवर ई-बुक्स उपलब्ध आहेत. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये अशा पाठ्यपुस्तकांविषयी जागरुकता नाही. आॅनलाईन माध्यमातून गणित विषय शिकवणे आणि शिक्षण घेणे अवघड आहे. गणित, विज्ञान या विषयांमध्ये अनेक सिद्धांत तसेच प्रयोग असतात, त्यावर उपाय अद्याप दूर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *