पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध

(Last Updated On: August 23, 2020)

मुंबई : केंद्र शासनाच्या वन नेशन वन रेशनकार्ड या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.
एका शिधापत्रिकेवर देशात कोठेही धान्य उपलब्ध करून देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. योजनेअंतर्गत देशातील अनुक्रमे महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, मिझोराम, ओरिसा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, दादरा-नगर हवेली व दीव-दमण, जम्मू काश्मीर, मणिपूर, नागालँड, उत्तराखंड येथील शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध असल्याचे श्री. पगारे यांनी सांगितले. मुंबई / ठाणे शिधावाटप यंत्रणेसह राज्यातील व उपरोक्त नमूद परराज्यातील पात्र शिधापत्रिकाधारक त्यांना देय असलेले अन्नधान्य अधिकृत शिधावाटप दुकानातून त्यांच्या शिधापत्रिकेवर पोर्टबिलिटीद्वारे प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतीलअंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह नियमित 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती 2 रुपये प्रतिकिलो दराने गहू, 3 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 35 किलो धान्य प्रतिशिधापत्रिका 2 रुपये प्रतिकिलो दराने गहू व 3 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरित करण्यात येत आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *