आता जुनी झाडे ठरणार ‘हेरिटेज’

(Last Updated On: August 25, 2020)

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या हिरकमहोत्सवानिमित्त राज्यात 75 विशेष रोपवाटिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार आहे. शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून सह्याद्री देवराई संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका बैठकीत दिली.
निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. या कामात महसूल व वन विभागासोबत सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड व संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच, राज्यात 75 ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत. राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटांच्या माध्यमातून अशा झाडांना ‘हेरीटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. ‘सह्याद्री वनराई’च्या मॉडेलच्या मदतीने राज्यात कमी वेळात ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून त्याला राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, यानिमित्ताने आज पार पडलेल्या सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वृक्षलागवडीसंदर्भातील विविध विषयांवरील बैठकीत वनमंत्री संजय राठोड, सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *