Home प्रादेशिक विदर्भ महिला सक्षमीकरणासाठी चालना : ठाकूर

महिला सक्षमीकरणासाठी चालना : ठाकूर

90

अमरावती : असंघटित क्षेत्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळवून देण्यासाठी लघु उद्योग, छोटे व्यवसायाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कोरोनाच्या काळातही व्यवसायाना चालना देऊन, तसेच विविध योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
अमरावती येथील मायनॉरिटीज इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या वतीने एस.के.प्रॉडक्शन अगरबत्ती उद्योगाचे उद्घाटन पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते झाले.त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, मायनॉरिटीज इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या वतीने अगरबत्ती व्यवसायाचा शुभारंभ आज होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अल्पसंख्याक समाजातील महिला भगिनींना रोजगार मिळून आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला ही कुटुंबाचा आधार असते. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली की कुटुंबाची प्रगती होते. अल्पसंख्याक भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी व्यवसायांचे जाळे निर्माण होणे आवश्यक आहे. या दृष्टीने चेंबर्सने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. अशा उपक्रमांना शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.