Home राष्ट्रीय अनलॉक-4 ची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून अमलात

अनलॉक-4 ची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून अमलात

308

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-४ ची मार्गदर्शक तत्व जारी केली असून त्यानुसार देशातली मेट्रो रेल्वे ७ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने सुरू करायला परवानगी दिली आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून जास्तीतजास्त १०० जणांच्या उपस्थितीत सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी प्रतिबंधित क्षेत्राला लागू होणार नाही.
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपस्थितांच्या संख्या मर्यादेबरोबरच, मास्कचा वापर, थर्मल स्कॅनिंग, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. संबंधित नियमांचे पालन करत २१ सप्टेंबर पासून खुली प्रेक्षागृह देखील उघडायला परवानगी मिळाली आहे.
शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था आणि शिकवणी वर्ग मात्र ३० सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच राहातील. हा निर्णय सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक चर्चा करून घेतल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. आॅन -लाईन आणि दूरस्थ शिक्षणाला परवानगी असून या कामासाठी शिक्षण संस्था ५० टक्के कर्मचाºयांना कामावर घेऊ शकतील. केवळ ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी स्वेच्छेने पालकांच्या लिखित अनुमतीने शाळेत येऊन शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकतील. चित्रपटगृह, तरण तलाव, मनोरंजन पार्क, बंदिस्त नाट्यगृह बंद राहतील. गृह मंत्रालयाची मंजुरी मिळालेल्या वाहतुकीशिवाय इतर सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद असेल.
आजारी व्यक्ती, ६५ वर्षांवरचे वृद्ध, १० वर्षाखालील मुले आणि गर्भवतींनी घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (महासंवाद)