आता विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा

(Last Updated On: September 1, 2020)

मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज याबाबत सांगितले.
मंत्रालयात सोमवारी मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आॅनलाईन बैठक संपन्न पार पडली.
श्री. सामंत म्हणाले, की विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार नाही. विद्यार्थी आणि पालक यांनी काळजी करू नये. या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. आॅक्टोबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व विद्यापीठ परीक्षेचे आयोजन करून निकाल जाहीर करतील असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
३१ आॅक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना मंत्र्यांनी यावेळी केल्या. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि अँडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *