Home उपराजधानी नागपूर नागपूर विभागात पूरग्रस्तांना वाढीव दराने तातडीने मदत

नागपूर विभागात पूरग्रस्तांना वाढीव दराने तातडीने मदत

189

नागपूर: नागपूर विभागात 30-31 आॅगस्ट व 1 सप्टेंबर रोजी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे तातडीची मदत म्हणून 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. या संदर्भात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून खर्च करण्यास आणि वाढीव दराने मदत देण्यासाठी होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास मान्यता देण्यात आली. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा व शिवणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे उपनद्यांना पूर येऊन ही परिस्थिती निर्माण झाली. या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची घरे पाण्यात बुडाली होती. घरांचे, घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी झोपड्याही नष्ट झाल्या होत्या.
क्षतीग्रस्त कपडे भांडी व घरगुती वस्तुंकरिता एसडीआरएफ आणि राज्य शासनाच्या निधीतून अतिरिक्त मदत अशी प्रति कुटुंब 5 हजार रुपये, अतिवृष्टी व पुरामुळे प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसिन मोफत, पूर्णत: नष्ट झालेले पक्के-कच्च्या घरांना व पूर्णत: नष्ट झोपड्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार अनुज्ञेय रक्कम, पूरग्रस्त भागातील घरांच्या बांधकामासाठी आवश्यकतेप्रमाणे 5 ब्रास वाळू व 5 ब्रास मुरुम मोफत देणे, शेती पिकाच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून खर्च करण्यात यावा व वाढीव (दुप्पट दर) खर्च राज्य शासनाच्या निधीतून, त्याचप्रमाणे जनावरांच्या गोठ्यांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून व 900 रुपये उर्वरित वाढीव रक्कम राज्य शासनाच्या निधीतून तसेच दुकाने, टपरीधारक, हातगाडी, हस्तकला, छोटे गॅरेज, बारा बलुतेदार, छोटे उद्योगधंदे यांना देखील राज्य शासनाच्या निधीमधून तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देण्याचे ठरले.
नुकसानीचे जिल्हावार पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत. 1994 नंतर प्रथमच हा महापूर आला असून यामध्ये 21 तालुक्यातील 261 गावे बाधीत झाली असून 96 हजार 996 लोकांना याचा फटका आहे. एकूण 167 मदत छावण्या उभारण्यात आल्या असून 13 हजार 692 नागरिक आश्रयास आहेत. (प्रतिकात्मक छायाचित्र)