जनतेला योग्य उपचार देणे सर्वोच्च जबाबदारी : डॉ. राऊत

उपराजधानी नागपूर राजधानी मुंबई

नागपूर/मुंबई  : नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तवल आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वोच्च आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यासाठी प्रशासन, पोलिस, आरोग्य, महानगरपालिका अशा यंत्रणांनी नियोजनपूर्वक एकछत्री अंमलात जबाबदारीने काम करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.
मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज दोन सविस्तर बैठकी घेतल्या. पहिली बैठक महानगरपालिका व पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांसोबत पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले होते.
कोरोनावर मात करण्यासाठी एस.एम.एस.(सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझर) हे प्रभावी उपाय आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असल्यास किमान १४ दिवस लॉकडाऊन लावावा लागेल. असे झाल्यास गोरगरीब, निराधार, लहान दुकानदार,पादचारी विक्रेते, बेरोजगार इत्यादी घटकांचे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात.उद्योगांवर देखील विपरित परिणाम होईल. मात्र, परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास काही दिवस लॉकडाऊन करण्याबाबतचा विचार करता येईल का, या संदर्भातही चर्चा करण्यात आली. गर्दीवरील नियंत्रणाबाबत पालकमंत्र्यांनी सर्वाधिक चिंता व्यक्त केली. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर निघू नये. शक्यतो आॅनलाईन पद्धतीने खरेदीचे धोरण स्वीकारायला हवे. बाहेरून आपल्या घरात येणारा व्यक्ती कोरोना घेऊन येऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहण्यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्या अंतर्गत कोरोना सुरक्षा समिती स्थापन करणे, लोकसहभागातून जनतेला आवाहन करणे, गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी एस.ओ.पी. तयार करून तत्काळ अंमलबजावणी करावी़ गस्त, बंदोबस्त, वाहनातून आवाहन, वाहतूक व्यवस्थेत बदल करून गर्दी नियंत्रणात आणून कोरोनाचा वाढता प्रसार थांबवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आयुक्त अमितेश कुमार यांच्या पोलिसांच्या सुरक्षा संदर्भातील प्रश्नावर पालकमंत्री राऊत यांनी तातडीने व्यवस्था करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच, त्यानंतरच्या बैठकीत सर्व वैद्यकीय आस्थापनांना पोलिसांसाठी बेड राखीव ठेवण्याचे त्यांनी निर्देशित केले. शिवाय पोलिसांना आॅक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, औषधी यासह अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *