पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरणार

(Last Updated On: September 16, 2020)

मुंबई : पोलिस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय आज बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मा.सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृषट्या मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.
पोलिस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5,297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6,726 पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येतील.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल. या योजनेत महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना याचा लाभ मिळेल. ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरीदेखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येतील.अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल. आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी 40 हजार व्यक्ती जखमी तर 13 हजार व्यक्ती मरण पावतात.
या योजनेत पहिल्या 72 तासांसाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे 74 उपचारपद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल. अतिदक्षता विभाग व वॉर्डमधील उपचार,अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश असेल. यात औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघातांचा समावेश नाही.योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकदेखील असेल. राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल.

सर्व जिल्ह्यांमध्ये होणार कृषी महोत्सव
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा महोत्सव 5 दिवसांचा असेल कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास या वर्षात राबविण्यात येईल.अन्यथा पुढील वर्षापासून आत्मा नियामक मंडळामार्फत हे महोत्सव आयोजित केले जातील. शेतकºयांना कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र यांच्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होते. तसेच, शेतकºयांना ग्राहकांसाठी थेट विक्रीची संधी मिळते. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *