केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान

(Last Updated On: September 16, 2020)

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकºयांचे नुकसान होत आहे, असे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रात 75 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्येसुद्धा जवळपास 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकºयांचा असतो या निर्णयामुळे त्यांचे मोठे नुकसान होईल.
खासदार शरद पवार यांनीसुद्धा काल केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीसंदर्भात चर्चा केली. तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. लिलाव थांबले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी उठवण्याची विनंती करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
केंद्र सरकारला पत्र पाठवणार
कांदा निर्यायतबंदी संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठवण्यात येईल. तसेच, पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात विचार मांडले. यावेळी प्रधान सचिव अनुप कुमार यांनी माहिती दिली की 2018-19 मध्ये 21.83 लक्ष मेट्रिक टन, 2019-20 मध्ये 18.50 लक्ष मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे सांगितले. मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जेएनपीटीमध्ये सध्या 4 लाख मेट्रिक टन कांदा पडून असून बांगलादेश, नेपाळ सीमेवर 500 ट्रक्स थांबून आहेत.(महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *