माविमचे ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’

(Last Updated On: September 19, 2020)

मुंबई : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता अॉणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. त्यासाठी निर्माण केलेल्या ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ [e business platform] या आॅनलाईन सुविधेचे महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी आॅनलाईन उद्घाटन झाले.
माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, युनिसेफच्या राज्यातील आहारतज्ज्ञ श्रीमती राजलक्ष्मी नायर आदी सहभागी झाले होते.
मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी माविम अधिनस्त बचत गटांच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेला शेतमालाला पारंपरिक बाजारापेक्षा अधिक बाजारभाव आणि व्यापक तसेच खात्रीशीर बाजारपेठा मिळवून देण्यासाठी आॅनलाईन व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार माविमने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कृतीदलाच्या सहाय्याने ही सुविधा निर्माण केली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून माविमचे एकूण 1 लाख 37 हजार स्वयंसहायता बचतगट आहेत. त्यापैकी 97 हजार 499 ग्रामीण 39 हजार 591 शहरी गट आहेत. माविमचे 361 लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी) आहेत. या बचतगटांशी 11 लाख 81 हजार ग्रामीण तर 4 लाख 28 हजार शहरी महिला जोडलेल्या आहेत.

‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’मध्ये सुमारे दीड लाख शेतकरी महिलांची, त्या उत्पादित करत असलेल्या शेतमाल तसेच कृषिपूरक उत्पादनांची माहिती भरण्यात आली असून यामध्ये अन्नधान्य, विविध भाजीपाला, फळभाज्या, फळपिके, नगदी पिके याचबरोबरीने शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी उत्पादनांबाबतची माहितीदेखील नमूद केली आहे. यापुढे ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार असून त्यामुळे राज्यातील माविमच्या बचतगटांच्या महिलांकडे असलेल्या शेतमालाची त्यावेळची (रिअल टाईम) माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे सोपे होणार आहे. पुढील काळात या माहितीची बाजारपेठेशी जोडणी (मार्केट लिंकेज) करण्यात येणार असून त्यामुळे उत्पादने विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होऊन अधिक बाजारभाव मिळणार आहे.

बैठकीत मंत्री अ‍ॅड. ठाकूर, माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे आदींनी अमरावती जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून माविमच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची माहिती जाणून घेतली. सचिव श्रीमती कुंदन यांनी महिला व बालकांच्या कल्याणासाठी विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम गतीने राबविण्यात येतील असे सांगितले. अमरावती व ठाणे जिल्ह्यात माविमने या उपक्रमाची यशस्वी प्रायोगिक चाचणी केली व शेळी तसेच भाजीपाल्याकरिता खरेदीदार मिळवून दिले, अशी माहिती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांनी दिली. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *