राज्यात ‘बांबू मिशन’ यशस्वी करावे : राज्यपाल

राजधानी मुंबई

मुंबई :  बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयंरोजगार देणारे महत्त्वपूर्ण साधन आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून राज्यातील विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन [ bamboo mission ]  यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केली.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित ‘बांबू मिशन’अंतर्गत सामुदायिक बांबू लागवड मोहीम या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल तसेच कुलपती कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले, यावेळी पणजी, गोवा येथील राजभवन येथून उपस्थितांना संबोधित करत होते.

बांबू लागवड अत्यंत कमी खर्चिक आहे. बांबूचा विस्तार झपाट्याने होतो. त्याला जलसिंचनाची आवश्यकता नाही. बांबूमुळे जमिनीची धूप थांबते व गुरांसाठी चारा उपलब्ध होतो. शेतजमीन, जंगल तसेच पहाडी प्रदेश कोठेही बांबू लागवड होते. पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या बांबूपासून टोपली, फर्निचर, वस्त्र, दागिने, राखी यांसह अनेक वस्तू तयार होतात. जीवनाच्या आरंभापासून तर थेट अंत्ययात्रेपर्यंत बांबू माणसाला उपयुक्त असणारी वस्तू आहे. विद्यापीठांनी आणि विशेषत: राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण जनतेला बांबू लागवड तसेच बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे विपणन करण्यासाठी मदत करावी, अशी सूचनाही राज्यपालांनी केली.
विद्यापीठातील प्राध्यापकांनी केवळ अध्यापनाचे कार्य न करता समाजाला आपले योगदान दिले पाहिजे असे सांगून बांबू मिशनला आपले मिशन बनवून यशस्वी करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने बांबू मिशन सुरू करून सन 2017 साली बांबूला वृक्ष न मानता गवत मानावे या दृष्टीने विधेयक पारित केले आहे. सदर विधेयकामुळे वनवासी व आदिवासी लोकांना बांबूचा उपजीविकेसाठी उपयोग करता येऊ लागला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *