Home राष्ट्रीय राज्यसभेत आठ खासदार निलंबित

राज्यसभेत आठ खासदार निलंबित

185

नवी दिल्ली : काल रविवारी कृषी सुधारणांशी संबंधित विधेयकेराज्यसभेत मंजुरीसाठी आल्यानंतर गोंधळ घालणाºया विविध पक्षांच्या आठ खासदारांना आठवड्याभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचा समावेश आहे. संसदेची नियम पुस्तिकेची प्रत फाडण्यासह सभापतींच्या बाकावरील माईक तोडण्याचाही विरोधकांनी प्रयत्न केला होता.
उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी राजीव सातव (काँग्रेस), डेरेक ओब्रायन (तृणमूल काँग्रेस), संजय सिंह (आम आदमी पक्ष), के.के. रागेश (माकप), रिपून बोरा (काँग्रेस), डोला सेन (एआयटीसी), सईद नाझीर हुसैन (काँग्रेस) आणि एलामरन करिम (माकप) या आठ खासदारांवरील निलंबनाच्या कारवाईबद्दल माहिती दिली. राज्यसभेसाठी कालचा दिवस अत्यंत वाईट होता. उपसभापतींना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात आले. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. संबंधित खासदारांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे सभापती व्यंकय्या नायडू आज सभागृहात म्हणाले. उपसभापतींच्या विरोधातील अविश्वास ठरावाची मागणी नियमांनुसार करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, कृषी सुधारणांशी संबंधित दोन विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020 तसेच शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही ती विधेयके आहेत.