अमरावती : बडनेरा क्षेत्रात निर्माण होत असलेला रेल्वे वॅगननिर्मिती प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून संपूर्ण देशात जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होणार आहे. वॅगननिर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी, राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य आपणास पुरविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तसेच पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी आज बडनेरा येथील वॅगन प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचे अभियंता एस. सी. मोहोड यांच्यासह अन्य रेल्वे तांत्रिक अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
मंत्री ठाकूर म्हणाल्या, की वॅगननिर्मिती प्रकल्पाच्या कामाला 2017 मध्ये सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल. प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी. प्रकल्पामुळे काटआमला गावाला जाणारा रस्ता बंद न करता वळण रस्ता म्हणून कायम सुरू राहण्यासाठी रेल्वे विभागाने नियोजन करावे, असेही त्या म्हणाल्या.
सदर प्रकल्प सुमारे 300 कोटी रुपयांचा आहे. वर्ष 2017 मध्ये प्रकल्पाच्या कामाला शुभारंभ झाला असून येत्या एका वर्षात प्रकल्पातील काही कामांचे टप्पे पूर्ण होणार आहेत. कोविड-19 च्या संकटामुळे कामांना काही प्रमाणात उशीर झाला आहे. आता पूर्ण ताकदीने कामे पूर्णत्वास नेणार आहोत. मध्य रेल्वेच्या अखत्यारितील झाशी वॅगन रिपेरिंग केंद्र्रातच सर्व कामे पूर्ण केले जात होते; परंतु आता या प्रकल्पामुळे नागपूर, भुसावळ, मुंबईपर्यंतच्या सर्व रेल्वेगाड्यांची दुरुस्ती आदि कामे पूर्ण होणार आहेत. या माध्यमातून 180 वॅगन प्रत्येक महिन्याला दुरुस्ती होऊ शकणार आहे. संपूर्ण बॉडी रिपेरिंग, बोगी शॉप, व्हील रिपेरींग, पेन्ट व इन्सपेक्शन शेड आदि महत्त्वाची केंदे्र उभारण्यात येणार आहेत. आधुनिक यंत्र, मशीन आणि तज्ज्ञ अभियंता, तांत्रिक कर्मचारी, कारागिर यांच्या सहाय्याने वॅगन दुरुस्ती व देखभाल अशी कामे पूर्ण केल्या जाते, अशी माहिती प्रकल्पाचे अभियंता एस. व्ही मोहोड यांनी दिली.