Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कडधान्य, तेल, कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणार

कडधान्य, तेल, कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणार

50

नवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झाले असून भरड धान्य, कडधान्य, तेलबिया, तेल, कांदा, बटाटा हे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ विधेयक,न्यायपूरक वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ विधेयकही मंजूर झाले आहेत.
जून 2020 मध्ये केंद्र सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाची जागा आजचे विधेयक घेईल. या सुधारणेनंतर शेतकºयांना त्यांचे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल़ मागणी आणि पुरवठा साखळीत संतुलन राखता येईल़ धान्य उत्पादन आणि साठवणुकीसाठी हे विधेयक उपयुक्त ठरेल, अशी माहिती अन्न अणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
संसदेने संमत केलेल्या या सुधारणा विधेयकामुळे सरकारला युद्ध तसेच दुष्काळी परिस्थितीत अन्नधान्याचा नियंत्रित पुरवठा करता येणार आहे.
राज्यसभेने आज कंपनी सुधारणा विधेयकालाही मंजुरी दिली. लोकसभेत यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. या सुधारणा विधेयकामध्ये काही गुन्ह्यासंबंधी तुरुंगवास तसेच दंडाची तरतूद शिथिल केली आहे. काही प्रकरणासंबंधित दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे. बँकिंग नियंत्रण सुधारणा विधेयकही आज संसदेत मंजूर झाले असून यामुळे बँकांच्या कारभारावर नियंत्रण येणार आहे. परवाना व्यवस्था, व्यवस्थापन आणि कामकाजासंबंधी तपशीलवार तरतुदींचा समावेश या विधेयकात आहेत.
दरम्यान, राज्यसभेत आज राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ विधेयक संमत करण्यात आले़ या विधेयकामुळे गुजरातमधील रक्षाशक्ती विद्यापीठाला ‘राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ’ म्हणून मान्यता मिळाली आहे. राज्यसभेने राष्ट्रीय फॉरेन्सिक अर्थात न्यायपूरक वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ विधेयकही मंजूर केले. ही दोन्हीही विधेयके लोकसभेत मंजूर झाली आहेत.
याशिवाय कर आणि संबंधित कायद्यातील सुधारणांविषयीचे विधेयक मात्र आज राज्यसभेतून मागे घेण्यात आले. हे विधेयक लोकसभेत संमत झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here