Home प्रादेशिक विदर्भ मालापुरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रारंभ

मालापुरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रारंभ

149

यवतमाळ : शासनाने प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणाºया पथकाला अचूक माहिती द्यावी़ त्यामुळे आपण कोरोनामुळे होणारे नुकसान टाळू शकतो, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी केले.
बाभुळगाव तालुक्यातील मालापूर येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. तरंगतुषार वारे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, डॉ. पी.एस.चव्हाण, मालापूरच्या सरपंच शांताबाई हुकरे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी रमेश दोडके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खोडवे, राजेंद्र्र दोनोड, अधिकारी, अंगणवाडी सेविका तसेच गावकरी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पीयूष सिंह म्हणाले, की बहुतांश नागरिक बेजबाबदारपणे वागत आहे. मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, हात वारंवार स्वच्छ न धुणे अशा नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनचा प्रादुर्भाव लक्षणीय वाढला आहे. मृत्युसाठी तर वयाचे बंधनही राहिले नाही. आपली जबाबदारी ओळखून किमान स्वत:साठी व आपल्या कुटुंबासाठी कोणतीही माहिती लपवू नका. घरात को-मॉरबीड नागरिक असेल किंवा एखाद्याला आयएलआय, सारी आणि कोरोनासदृश्य लक्षणे असल्यास पथकाला माहिती द्या,जेणेकरून मृत्युदर कमी करण्यात यश येईल. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, कोरोनावरील लस कधी येणार हे अजूनही निश्चित नाही. त्यामुळे वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, हीच सध्या मुख्य औषध आहे. सर्व्हेक्षण करतांना आयएलआय, सारी, को-मॉरबीड नागरिकांची माहिती व्यवस्थित नमूद करा. बाभुळगाव तालुक्यात संपूर्ण आरोग्य पथकाने चांगले काम केल्यामुळेच येथे मृत्युदर कमी आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, कोरोनासोबत जगण्याची आपल्याला सवय करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी लोकांनी स्वत:हून समोर येणे गरजेचे आहे. शिवाय सर्वांनी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य यंत्रणेने सदाशिवराव राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबातील नागरिकांची पल्स आॅक्सिमीटर व गनच्या सहाय्याने आरोग्य तपासणी केली. तत्पूर्वी जनजागृती साहित्याचे विमोचन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here