गोंडवाना विद्यापीठास यूजीसीतर्फे १२-बी दर्जा प्राप्त

राजधानी मुंबई विदर्भ

मुंबई / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२-बी दर्जा प्राप्त झाला आहे. आता विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या दौºयावर असताना हा दर्जा मिळवून देऊ, असे आपण विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.
सन २०११ मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने १२-बी चा दर्जा मिळविण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव आयोगाने मंजूर केला आहे. आणि तसे परिपत्रक आज विद्यापीठास पाठविले आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत अनुदान प्राप्त करता येणार आहे. या दर्जामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांना देखील आयोगाच्या विविध योजनांचा निधी प्राप्त होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री श्री.शिंदे आणि महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे सहकार्य करीत आहे. विद्यापीठाला १२-बी असा दर्जा मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन उदय सामंत यांनी अभिनंदन केले आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *