संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

(Last Updated On: September 24, 2020)

नवी दिल्ली : कोविड-19च्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी नियोजित कालावधीच्या आधीच संस्थगित करण्यात आले. चालू महिन्याच्या 14 तारखेला अधिवेशनाला सुरुवात झाली होती़ तसेच, ते 1 आॅक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आले होते.
लोकसभेत मंजूर झालेली विधेयक राज्यसभेतही मंजूर झाली असल्याने वेळापत्रकाच्या आधीच सभागृहात कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत दिली. राज्यसभेत 25 विधेयक मंजूर झाल्याचे आणि सहा विधेयक मांडण्यात आल्याचे सभागृहाचे अध्यक्ष एम. व्यंकया नायडू यांनी सांगितले. सदनाचे कामकाज 100 टक्के क्षमतेने झाल्याचेही त्यांनी नमूद केले़ तसेच, त्यांनी कोरोनाच्या कठीण काळातही अधिवेशनयसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सदस्यांचे आभार मानले. कोविड-19 च्या आजाराशी लढा देण्यात मोलाचे योगदान देणाºया कोरोना योद्ध्यांचीही त्यांनी प्रशंसा केली. दुसरीकडे लोकसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी संस्थगित करत असल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.
तत्पूर्वी, राज्यसभेत विदेशी देणगी नियामक सुधारणा विधेयक २०२० आणि वित्तीय संस्था द्विपक्षीय नेटींग विधेयकही मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर कामगार कल्याणाच्या उद्देशाने मांडण्यात आलेल्या तीन कामगार विषयक विधेयकांनाही राज्यसभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, अशा महत्त्वाच्या विधेयकांच्या मंजुरीच्या वेळी विरोधी पक्ष सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *