Home राष्ट्रीय प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

234

चेन्नई : प्रसिद्ध तेलुगु, तामिळ, हिंदी भाषेतील गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. संगीत तसेच अभिनय क्षेत्रात ते ‘एसपी’ या नावाने ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध भारतीय भाषांत सुमारे 40 हजार गाणी गायिली आहेत. [ sp balsubramnyam ]
मागील काही आठवड्यापासून एसपी यांच्यावर चेन्नईमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याने कोव्हिड चाचणी केल्यानंतर ती पॉझिटीव्ह आली. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. शिवाय व्हेंटिलेटर आणि एक्मो सपोर्टवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
अल्पपरिचय
एसपी बालसुब्रमण्यम यांना ओळख मिळाली ती सन 1981 मधील कमल हासन आणि रती अग्निहोत्री अभिनित ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटापासूऩ 1990 च्या सुमारास त्यांना अभिनेता सलमान खान याचा आवाज म्हणून नवी ओळख मिळाली. सलमान खानची भूमिका असलेला मैने प्यार किया, पत्थर के फूल, लव्ह, हम आपके है कौन या हिंदी चित्रपटांसाठी गायन केले होते. याशिवाय अरविंद आणि मधू रघुनाथ यांची भूमिका असलेला रोजा, हंड्रेड डेज,अंधा कानून, चेन्नई एक्सप्रेस, अंगार आदी चित्रपटातील त्यांची गाणी गाजली होती. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासोबतची एसपींची सर्व गाणी गाजली आहेत.
तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावे आहे. एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. हिंदीतही 16 गाणी रेकॉर्ड केली होती. विशेष म्हणजे एसपी यांनी आपल्या कारकिर्दीत गायक, डबिंग आर्टिस्ट, संगीत दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री (2001) आणि पद्मभूषण (2011) सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.
मनस्वी अवलिया : मुख्यमंत्री
मुंबई : आपल्या नाद-मधुर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलीकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील, ते त्या अर्थाने अजरामर आहेत. एक मनस्वी कलाकार आपल्यातून निघून जाणे दु:खद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
संगीतातील मोठा ठेवा : उपमुख्यमंत्री
हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेली 40 हजारांहून अधिक गाणी हा भारतीय संगीतातील मोठा ठेवा आहे. हा ठेवा संगीत रसिकांना मनमुराद आनंद तसेच त्यांची आठवण करून देत राहील. भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहे.