Home राष्ट्रीय तावडेंसह पंकजा मुंडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी

तावडेंसह पंकजा मुंडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी

181

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज राष्ट्रीय कार्यकारिणीत काही बदल केले असून यात महाराष्ट्रातील पाच नेत्यांना मोठी संधी मिळाली आहे़ यात मागील विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या पंकजा मुंंडे यांचाही समावेश आहे़ दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मात्र पुन्हा एकदा डावलले गेले आहेत.
विधानसभा 2019 च्या निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त सातत्याने येत होते. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा याठिकाणीही जागा न मिळाल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चेत आणखी भर पडली होती. आता मात्र त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपने एकूण 13 जणांची राष्ट्रीय सचिव म्हणून नेमणूक केली आहे. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांचा समावेश आहे. शिवाय खासदार हीना गावित यांना राष्ट्रीय प्रवक्तेपदी नेमण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे म्हटले होते. असे असले तरी पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पदरी कोणतीही संधी पडलेली नाही.