महाराष्ट्राला सर्वाधिक आरोग्य साक्षरताचे राज्य बनवणार : मुख्यमंत्री

राजधानी मुंबई

मुंबई : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले असे नमूद करून महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनविणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी आज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या प्रादेशिक विभागातील जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, पालकमंत्रीदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते़
सर्व विभागांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली असेल, आणि लक्षणे असतील त्यांची आरटी-पीसीआर चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठीच दोनदा स्वाब (द्राव्य) घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यात दर दहा लाख लोकसंख्येमागे ४५ हजारांपेक्षा जास्त आरटीपीसीआर चाचणी केली जाते; पण चार विभागातील काही जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षा कितीतरी कमी चाचणी केली जाते, ज्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरुणपिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जाऊ लागली आहे. त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरू केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर केले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नाविन्यपूर्ण उपक्रम
कोल्हापूर जिल्ह्याने नो मास्क, नो एन्ट्री असा उपक्रम राबायला सुरुवात केली असून दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी यात सहभागी केले आहेत, गडचिरोली जिल्ह्याने या मोहिमेत महत्त्वाचा घटक असलेल्या आशा कार्यकतीर्ला थँक्यू आशाताई असे पत्र देणे, अकोला जिल्ह्यात नो मास्क, नो सवारी अशी मोहीम तसेच सर्व रिक्षांमध्ये मोहिमेची गाणी वाजविणे किंवा पोस्टर्स लावणे, लोक कलावंतांचा उपयोग करून घेणे, माजी सैनिकांना पथकांमध्ये सहभागी करून घेणे व लोकांना आरोग्य तपासणीस तयार करणे, औरंगाबाद जिल्ह्याने दवंडी पिटणे, घंटागाड्यांमध्ये मोहिमेची आकर्षक जाहिरात करणे, नांदेडचे कोरोना विलगीकरण अभियान, बीडमधील मेळावे, सहव्याधी रुग्णांना शोधण्यावर नाशिकने दिलेला भर आदी उपक्रम विविध जिल्हा प्रशासन राबवत आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे कौतुक केले़.(महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *