कायदे, दंड करून मार्ग निघणार नाही : मुख्यमंत्री

(Last Updated On: September 29, 2020)

नागपूर : कोरोना संक्रमणाने महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत केवळ कायदे व दंड करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी आज नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
बैठकीला नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, भंडाराचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी़, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागपूर जिल्ह्यातील मोहिमेबाबतची सद्यस्थिती सादर केली. सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली.
कोरोना संदर्भामील सर्व उपाययोजना करता येईल. मात्र रुग्णांची संख्या वाढल्यानंतर लस येईपर्यंत त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कुठून आणणार? प्रत्येक सुविधांसाठी मर्यादा आहेत. त्यामुळे प्रत्येक घराघरात जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी ही मोहीम अतिशय सक्रियतेने राबविणे महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कायदे व दंड करून यातून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी जाऊन चौकशी करणे, प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणे, कोरोना विषयक चाचण्यांमध्ये गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणे, डॉक्टरांसोबत चर्चा करून आरोग्यविषयक सुविधा सुधारणे आदी बाबींवर लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले. आपले स्वप्न कोरोना मुक्त महाराष्ट्र आहे. आगामी काळात सर्वाधिक कोरोना बाधितांचा महाराष्ट्र नव्हे तर कोरोना मुक्त महाराष्ट्र, असे चित्र राज्याचे निर्माण झाले पाहिजे. यासाठीच ही मोहीम आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी सर्वानी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *