Home राजधानी मुंबई महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार

महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार

49

मुंबई : वैज्ञानिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आज महाराष्ट्रातील चार शास्त्रज्ञांना केंद्र शासनाचा मानाचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020 साठी एकूण सात श्रेणींमध्ये 14 वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर झाले असून यात मुंबई आणि पुणे येथील प्रत्येकी दोन अशा एकूण चार शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
माहितीनुसार, विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने (सीएसआयआर) संस्थेच्या एसएस भटनागर सभागृहात आज 79 व्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भूविज्ञान मंत्री तथा सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. सीएसआयआरचे महासंचालक तथा विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे यांनी वर्ष 2020 च्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकांच्या नावाची घोषणा केली. 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमधील दोन्ही पुरस्कारांवर राज्यातील वैज्ञानिकांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे. सीएसआयआर प्रणित पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी आणि मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किंशुक दासगुप्ता हे या श्रेणीत विजेते ठरले आहेत.
याशिवाय आपल्या कार्यकतृत्वाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणाºया मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दोन वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे. संस्थेच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सुर्येंदू दत्ता यांना पृथ्वी, वातावरण, समुद्री व ग्रहविज्ञान श्रेणीमध्ये तर गणित विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. यू. के़ आनंदवर्धन यांना गणिती विज्ञान श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here