जोधपूर (राजस्थान) : माजी केंद्रीय मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांच्यावर रविवारी सायंकाळी जोधपूर येथील फार्महाऊस परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र मानवेंद्र सिंह यांनी मुखाग्नी दिला.
जसवंत सिंह (वय 82) यांचे आज सकाळी दिल्लीत निधन झाले होते. यानंतर त्यांचे पार्थिव हवाई मार्गाने जोधपूर येथे आणण्यात आले. दरम्यान, जसवंत सिंह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 1996 ते 2004 दरम्यान संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. 2014 साली पक्षाने त्यांना लोकसभाची उमेदवारी दिली नव्हती़ त्यामुळे जसवंत सिंहांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. आॅगस्ट 2014 मध्ये त्यांची प्रकृती बिघडली़ तेव्हापासून ते कोमात होते.
सुरुवातीच्या काळात भारतीय सैन्यदलात काम केल्यानंतर जसवंत सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला होता. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते.
त्यांनी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात पक्षाचे प्रतिनिधित्व केले. वित्तमंत्री असताना स्टेट व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (व्हॅट) पद्धतीची सुरुवात केली होती़ परिणामी अनेक राज्यांना महसूल मिळू लागला होता. त्यांनी कस्टम ड्युटीही कमी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह अन्य नेत्यांनी सिंह यांच्या निधनासंबंधी संवेदना व्यक्त केल्या आहेत.