असा मृत्यू का यावा…

संपादकीय

मृत्यू हा शाश्वत आणि सत्य. संपूर्ण जीवनमान त्याला स्वीकारतात; परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होत असेल, ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या मानवजात नको तितकी ‘फास्ट’ झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो नियमांना पायदळी तुडविणे, हे फार शहाणपणाचे समजतो, मग त्यात प्राण गेला तरी बेहत्तर! असंच काहीसं सध्या होत आहे़ वाहनातून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी हा मानव पार नियम तोडत आहे आणि पदरी मात्र अपघाती मृत्यू ओढवून घेतोय. देशातील प्रत्येक मार्गावर अपघात होत आहेत़ रस्ता एकपदरी असो वा सहापदरी कोणताही जीव त्यावर सुरक्षित नाही़ कोणताही चांगला मार्ग वाहनांच्या सुरक्षित वेगासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी असला तरी वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, सुरक्षित व्हावी,हाही त्यामागील हेतू आहे. यापैकी अतिवेगाचा हेतू तर साध्य झाला;परंतु सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीचा हेतू साध्य झालेला आहे, असे काही ठाम म्हणता येणार नाही. कारण रस्तोरस्ती अजूनही अपघातांची मालिका दिसून येते़ भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच; परंतु सहापदरी आणि चारपदरी अशा अधिक रुंदीच्या मार्गांवरही असे अपघात वारंवार व्हावेत,हे मोठे दुर्दैव आहे.
अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसते. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत असतात. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणाºया वाहनांमध्ये किती प्रवासी कोंबावेत, वाहनचालकाने सलग किती तास ‘ड्रायव्हिंग’ करावी आणि वाहनाचा वेग किती असावा यावर सरकारने लक्ष ठेवावे,असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. म्हणजेच अपघातांना इतर कारणांपेक्षा मानवी चुका अधिक कारणीभूत असल्याचे लक्षात येते. या चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते, तिथून ती अतिवेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्तीपर्यंत संपते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही देशातील अपघातांविषयी विस्तृत माहिती काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती.
अगदी बनावट परवाधारक चालकापासून वळणावर वाहन असताना मोबाईलवर बोलण्यापर्यंतची साखळी अपघाताला कारणीभूत ठरली आहे, व्यवस्थित परवाने न दिलेले हे वाहक वाहतुकीच्या नियमांबाबत कधीच दक्ष नसतात. उलट आपण वाहतुकीचे नियम डावलून हमखास वाहतूक केली पाहिजे,याबाबत ते गरजेपेक्षा जास्त दक्ष असतात. त्यामुळे वेगाची मर्यादा न पाळणे, टोलनाक्यावर भरधाव गाडी ‘लेन’ तोडून दुसºया ‘लेन’मध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या एकूण अपघातांपैकी ८४ टक्के अपघात हे अशा प्रकारच्या मानवी चुकांमुळे होतात,असे पाहणीत आढळले आहे. भारतात रस्ते अपघातात जीव जाणाºयांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशिस्त आहेत, यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे,‘ओव्हरटेक’ करण्याची चुकीची पद्धत आदी बाबी प्रामुख्याने आढळतात. अनेकदा प्रवासीही चालकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशाप्रकारामुळे वेगाची ‘झिंग’ दारूच्या नशेत, मोबाईलवर बोलण्याच्या नशेत पूर्ण होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो, ही जाणीव त्यांना नसते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे. (वाहन उत्पादक कंपन्यांनी मासिक हप्त्यांची सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे.) मात्र, रस्ते आहेत तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे ‘सुरक्षित वाहतूक’ हे आव्हान समाजासमोर दिवसांगणिक बिकट होत चालले आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *