लता, बस्स एक स्वर….वाढदिवस विशेष

मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य

२७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लतादीदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों…’ हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा दीदींच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाºया जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. लता दीदींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी उभी राहिली, तेव्हापासून तत्कालिन गायकांसह सध्याच्या नव्या पिढीच्या गायकांसोबत त्यांनी गायन केले.

लता मंगेशकर…भारताच्या गानकोकिळा…भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ (सन २००१) मिळवणाºया दुसºया गायिका आहेत. त्यांच्या अजरामर गाण्यांनी जवळपास सात दशके रसिकांना भुरळ घातली आहे. त्यांच्या नावाची दखल गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लतादीदींना गौरवण्यात आले आहे. आजवर जवळपास सर्वच भारतीय भाषांत त्यांनी गाणी गायिली आहेत. केवळ भारत नव्हे तर जगभरातील रसिकांवर त्यांची मोहिनी आहे. सन १९७४ ते १९९१ या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.
१९६० च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. या काळात लतादीदींनी जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या…’ हे ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. ‘अजीब दास्ताँ है…’ ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (१९६०) मध्ये मीना कुमारीवर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले. १९६१ मध्ये दीदींनी सचिन देव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी ‘अल्ला तेरो नाम…’हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

इ.स. १९६२ मध्ये लता मंगेशकर यांनी ‘बीस साल बाद’ चित्रपटातील ‘कहीं दीप जले कहीं दिल…’ या हेमंतकुमार मुखोपाध्याय-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.
इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्याबरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर ‘गाईड’ (१९६५) मधील आज फिर जिनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्वेल थीफ  (१९६७) मधील ‘होठों पे ऐसी बात…’ यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी गायिली.
लता मंगेशकर यांनी संगीतकार मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी गायिली. यात ‘अनपढ’ ( १९६२) चे ‘आपकी नजरोंने समझा, वो कौन थी (१९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया ( १९६६) चे तू जहां जहां चलेगा…या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लता मंगेशकर यांनीच गायिली आहेत. १९६३ मधील ‘पारसमणी’ या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या चित्रपटातील गाणी लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठीत अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करावा लागेल. लतादीदीने स्वत: ‘आनंदघन’ अशा नावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिली आहेत.
सबकुछ संगीत…
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.

‘अभिवृत्त’कडून दीदींना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

(छायाचित्रे साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *