जीवनशैलीत बदल करणे आवश्यक

राजधानी मुंबई

मुंबई : आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी टाळणे गरजेचे आहे. लोकांचा संयम हा देखील महत्त्वाचा विषय आहे; पण कोरोनासोबत जगताना आता प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नमूद केले.
ते रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बोलत होते.
मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरू करताना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे़ रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाºयांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणूने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो हे गंभीर आहे. एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचे सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.
बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलीप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के.भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *