Home राजधानी मुंबई महास्वयंम वेबपोर्टलमार्फत ५३ हजार बेरोजगारांना नोकरी

महास्वयंम वेबपोर्टलमार्फत ५३ हजार बेरोजगारांना नोकरी

92

मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले आॅनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत [ mahaswayam] राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ५३ हजार ४१ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

फक्त आॅगस्ट महिन्यात १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तत्पूर्वी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. याशिवाय कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉपोर्रेट्स हे सुद्धा वेबपोर्टलवर नोंदणी करून कुशल उमेदवार शोधू शकतात. बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम वेबपोर्टलमार्फत करण्यात येत असल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले.

माहे आॅगस्टमध्ये ३७ हजार ३२० उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ६ हजार ७१०, नाशिक विभाग ५ हजार ६८७, पुणे विभाग १२ हजार ५२३, औरंगाबाद विभाग ७ हजार ८८, अमरावती विभाग २ हजार ३४९ तर नागपूर विभागात २ हजार ९६३ उमेदवारांनी नोंदणी केली. माहे आॅगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ७५४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार १७७, नाशिक विभाग १ हजार ७६४, पुणे विभाग ६ हजार ३२०, औरंगाबाद विभाग २ हजार ९३२, अमरावती विभाग ११० तर नागपूर विभागात ४५१ इतक्या उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला.

पुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी  वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी. तसेच, कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉपोर्रेट्स यांनीही वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्र्यांनी केले आहे. (महासंवाद)