९०० लाख कापूस गाठींचे उत्पादन अपेक्षित : पणनमंत्री

राजधानी मुंबई

मुंबई : कृषी खात्याच्या अंदाजानुसार चालू हंगामामध्ये ४२.०७ लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आले असून ४५० लाख क्विंटल कापूस (९०० लाख गाठी) इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन अपेक्षित आहे. याचा विचार करून भारतीय कपास निगम (सीसीआय), महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासूनच कापूस खरेदीचे नियोजन करावे, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ च्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी यांच्याशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करून प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान एक ग्रेडर असावा, कापूस खरेदीपूर्वीच कृषी विभागामार्फत आवश्यक ते मनुष्यबळ ग्रेडर म्हणून उपलब्ध करावे़ तसेच, त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावेत, खरेदी केलेला कापूस साठवणुकीची व्यवस्था, सोयीसुविधा इतर नैसगिक आपत्तीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने गोदाम, शेड, ताडपत्री इ.व्यवस्था करावी, बाजार समितीस्तरावर शेतकरी निहाय नोंदवही/रेकॉर्ड ठेवावे, ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकºयांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावा, कापूस केंद्रावर आणण्यापूर्वी संबंधित शेतकºयांना कापूस खरेदीचे ठिकाण व वेळ मोबाईल एसएमएसद्वारे पाठवावे, कृषि उत्पन्न बाजार समितीने समन्वय ठेवून भारतीय कपास निगम, कपास भवन, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक यांनी नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्र्यांनी केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खरेदी केंद्रांवर गर्दी होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करावी. वाहन व्यवस्थासह सर्वांच्या बसण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सूचना मंत्र्यांनी केली. बैठकीला कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक, कृषी पणन संचालक सतीश सोनी, सीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. अग्रवाल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *