नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा : गृहमंत्री

(Last Updated On: September 30, 2020)

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छताबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. शिवाय ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मुंबई : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता १७ आॅक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव, दुर्गापुजा, दसरा साध्या पद्धतीने साजरा करावा़
त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून त्याचे पालन करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महानगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. घरगुती तसेच सार्वजनिक देवी मूर्तिची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. मूर्तिची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती मूर्तिची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. यंदा शक्यतो पारंपारिक देवी मूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तिचे पूजन करावे.
मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था नसावी. मूर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्याने कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
देणगीसंबंधी
नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा आॅनलाईनद्वारे उपलब्ध करून द्यावी. मंडपांमध्ये निजंर्तुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी. मंडपात शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग), स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर आदी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे आवाहन गृहविभागाने केले आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *