कोविड-१९ लढाईच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीत धुळे जिल्हा पहिला

राजधानी मुंबई

मुंबई : आरोग्य विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कोविड-19 युद्धात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा म्हणून धुळे पहिल्यास्थानी आहे. कोविडमुक्तांचे प्रमाण जवळपास 85 टक्के तर कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा अग्रस्थानी असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली़ तसेच, त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.
आरोग्य विभागाच्या एकत्रित संकलित अहवालानसुार धुळे येथील कोविडमुक्तांचे प्रमाण 84.22 टक्के इतके असून ते महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रमाण आहे. याशिवाय कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आहे. कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सुरुवातीला 100 टक्के होते. आता यात सुधारणा होऊन हा मृत्यू दर 2.66 टक्के इतका खाली आला आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धुळे आणि मालेगाव येथे कोविड -19 परिस्थितीशी निपटण्यासाठी खास नेमणूक केलेल्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांच्यासह प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र डॉ. निर्मलकुमार खंदळे, प्राध्यापक व विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र डॉ. राजेश सुभेदार, कोविड समन्वयक डॉ.दीपक शेजवळ, डॉक्टर्स, पारिचारिका आदी सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
याशिवाय अमित देशमुख यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे अभिनंदन आणि आभार मानले आहेत. कोविड-19 परिस्थिती पाहता पालकमंत्र्यांनी लिक्विड आॅक्सिजन युनिटला मान्यता दिली. जिल्हाधिकारी डॉ. संजय यादव यांच्या नेतृत्चाखाली संपूर्ण पथक काम करीत आहे.
23 सप्टेंबर 2020 रोजीच्या आरोग्य विभागाच्या अहवालानसुार धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे प्रामुख्याने आदिवासी, दुर्बल आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील नागरिक येत असतात. याच रुग्णालयात कोविड-19च्या रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. कोविड-19 मध्ये लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा असून धुळेकर जनतेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही शारीरिक दूरता पाळणे, नियमित मास्क वापरणे आणि वारंवार हातांची स्वच्छता करणे या बाबींचे तंतोतंत पालन आवश्यक असल्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यानिमित्ताने केले आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *