‘पोषण माह’ अभियानात महाराष्ट्र देशात प्रथम

राष्ट्रीय

नवी दिल्ली : राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत तृतीय ‘पोषण माह’ या विशेष मोहिमेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. कोविड-19 च्या विपरित परिस्थितीमध्येही सर्व दिशानिर्देशांचे पालन करून राज्य शासनाने तृतीय ही मोहीम उत्कृष्टपणे राबविली आहे.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने मंगळवारी तृतीय ‘पोषण माह’ कार्यक्रमाच्या समारोपाचे आयोजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देबश्री चौधरी, केंद्रीय महिला व बालविकास सचिव राम मोहन मिश्रा, विविध राज्यातील महिला व बालविकास मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच अभियान राबविणाºया विविध अशासकीय संस्था उपस्थित होत्या. महाराष्ट्रातून महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त इंदरा मालो उपस्थित होत्या.
7 ते 30 सप्टेंबरदरम्यान तृतीय ‘पोषण माह’ विशेष मोहीम देशभर राबविण्यात आली. या अंतर्गत अतितीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे, त्यांना योग्य पोषण मिळेल याचे नियोजन करणे, स्तनदा मातांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करणे, जन्मापासून ते एक हजार दिवसांपर्यंत अधिक पोषक आहाराबद्दल माहिती देणे, तसेच महिला आणि बालकांमधील एनिमीया कमी करण्याच्या उपायांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
अशा उपाययोजना
सदर विशेष मोहिमेमध्ये राज्य शासनाने अतितीव्र कुपोषित बालकांची छाननी केली. त्यांना सुक्ष्म 45 पोषण आहार प्रदान करण्यात आले. अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलच्या माध्यमातून बालकांचे वजन, उंची नोंदवण्यात आली. घरोघरी जाऊन योग्यप्रकारे काळजी घेण्याबाबत पालकांना जागरूक करण्यात आले. यासह गरोदर तसेच स्तनदा मातांचा आहार, त्यांचे लसीकरण आरोग्य विभागाच्या सहायाने करण्यात आले. महिलांमध्ये आंतरबाह्य स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली, त्यांना काही समस्या असल्यास त्यांचे
समुपदेशन करण्यात आले. न्यट्री किचन गार्डन ही परिकल्पना महाराष्ट्राने दोन वर्षांपूर्वीच सुरू केली असून यातंर्गत आतापर्यंत 10 हजार न्यट्री किचन गार्डन महाराष्ट्रात असल्याची माहितीही दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात श्रीमती कुंदन यांनी दिली.
केंद्र शासनाच्या डॅशबोर्डमध्ये सर्वाधिक कार्यक्रमांच्या नोंदी महाराष्ट्राने केल्या आहेत. या डॅशबोर्डमध्ये राज्याने 5 कोटी 38 लाख 12 हजार 326 नोंदी केल्या असून देशात महाराष्ट्र प्रथम ठरले आहे. तर उत्तर प्रदेश दुसºया क्रमांकावर आहे. पोषण माहदरम्यान सर्वाधिक सहभागी तामिळनाडूमधून सहभागी झाले तर या गटात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मंत्री मंडळातील इतर सदस्यांचे मार्गदर्शन यासह काटेकोर नियोजन, अंमलबजावणी, लोकांचा तसेच अंगणवाडी सेविका, शासनाचे इतर विभाग यांचा सक्रिय सहभाग यामुळे यश प्राप्त करता आले,अशी भावना महिला व बालविकास खात्याच्या सचिव आय.ए. कुंदन तसेच एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त इंदिरा मालो यांनी वेबिनारमध्ये व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *