Home राजधानी मुंबई पर्यावरण, वन्यजीव रक्षणाची ‘जाग’ आयुष्यभरासाठी जपूया : मुख्यमंत्री

पर्यावरण, वन्यजीव रक्षणाची ‘जाग’ आयुष्यभरासाठी जपूया : मुख्यमंत्री

68

मुंबई : वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रति येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपूया,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्यात १ आॅक्टोबर ते ७ आॅक्टोबर या काळात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला, वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्धता
वन्यजीव म्हणजे केवळ वाघ नाही तर वाघ केवळ एक प्रतीक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या जंगलात वाघ असतो ते जंगल पूर्ण असते. जंगल पूर्ण असणे हे जीवसृष्टीचे एक मोठे जीवनचक्र आहे. त्याचे रक्षण करणे, त्याबद्दल जाग आणण्यासाठी या सप्ताहाचे महत्त्व अधिक आहे. वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणाची हीच जाग जपत या शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईत जवळपास ८०० चौ. किमीचे आरेचे जंगल आरक्षित करण्याचा प्रस्ताव त्याच उद्देशाने आणल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राला संपन्न जैवविविधता
राष्ट्रीय उद्याने अनेक ठिकाणी आहेत; परंतु मुंबई महानगरात शहराच्या मधोमध वसलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे जंगल आहे जिथे निसर्गत: वन्यजीव, पशुपक्षी, कीटक, फुलपाखरं आणि असंख्य जीवजंतू आहेत. जीवसृष्टीचे चक्र पूर्ण करणारे जंगल आहे, शासन त्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्राला विपुल जैवविविधता लाभल्याचे सांगताना त्यांनी ७२० किमीच्या समुद्रकिनारी भागातील जीवसृष्टी जपायलाही शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.