चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक : अमित देशमुख

(Last Updated On: October 1, 2020)

मुंबई : राज्यातील चित्रपट आणि नाट्यगृहे करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी थिएटर्स ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितले.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशनसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनिषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालिका आंचल गोयल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन, थिएटर आणि फिल्म स्टुडिओचे ओनर्स उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले, की कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य शासनाने राज्यातील सिनेमागृहे (सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, फिल्म स्टुडिओ) बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या राज्यात अनलॉक-5 चा टप्पा सुरू आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शकतत्वानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रपट-नाट्यगृहे मात्र बंद राहणार आहेत. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक चित्रपट प्रदर्शित होत असल्याने याच काळात प्रेक्षकांची गर्दी होत असते. त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत चित्रपटगृहे कशी सुरू करता येतील याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
थिएटर्स ओनर्स यांनी यावेळी बंद पडत असलेले सिंगल स्क्रिन थिएटर्स, सिंगल स्क्रिन थिएटर्स चालवताना येत असलेल्या अडचणी, थिएटर्स सुरू राहण्याबाबत देण्यात येणारे परवाना वीज बिल, मालमत्ता कर, विविध परवाने आदीसंबंधी समस्या मांडल्या.
बैठकीला सिंगल स्क्रिन ओनर्सपैकी उदय टॉकीजचे नितीन दातार, सेंट्रल सिनेमाचे शरद जोशी, कस्तुरबा सिनेमाचे निमिश सोमय्या, न्यू शिरीनचे विराफ वच्छा, आशा सिनेमाचे तेजस करंदीकर तर मल्टिप्लेक्स असोसिएशन आॅफ इंडियाचे दीपक अशेर, मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्सचे आयनॉक्सचे अलोक टंडन, पीव्हीआरचे कमल ग्वानचंदानी, सिनेपॉलिसचे देवांद संपत, कार्निव्हलचे कुणाल सोहनी, सिटी प्राईडचे प्रकाश चाफलकर, यूएफओचे कपिल अग्रवाल, राहुल हसकर, राम निधानी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *