संरक्षणगृहातील मुलींना आत्मनिर्भर करणार : अ‍ॅड. यशोमती ठाकूर

(Last Updated On: October 1, 2020)

नागपूर : महिला व बाल विकास सरंक्षण गृहातील महिला, मुली तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या महिला व मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी न्यायालय, पोलिस तसेच महिला व बालविकास विभाग समन्वयाने काम करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज शासकीय मुलींचे वसतिगृह, प्रियदर्शनी महिला वसतिगृह तसेच करुणा होमला भेट देवून येथील मुली व महिलांसोबत संवाद साधला. संरक्षण विभागात येणाºया अडचणी तसेच त्यांच्या शिक्षण तसेच कौशल्य विकासासंदर्भात प्रथमच मंत्र्यांसोबत मनमोकळ्या चर्चा केल्या. महिला व मुलींच्या संरक्षणासोबतच त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निर्णय घेवून आत्मनिर्भर करण्याबाबत आश्वस्त केले.
बालविकास संरक्षण गृहात मुली व महिला सोबतच 6 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ व पीडित बालकांचा समावेश असून यासोबतच इतर राज्यातील घर सोडून आलेल्या मुली, अनैतिक व्यापार प्रतिबंध नियमांतर्गत संरक्षण दिलेल्या मुलींचा समावेश असून महिला व बालविकास विभागाकडून अशा सर्व महिला व मुलींच्या पुनर्वसनासोबतच शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबतही महिला व बालविकास मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. नागपूर शहर संरक्षण विभागात 100 महिला व मुली असून मुलींना संरक्षण गृहात विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
मंत्री ठाकूर यांनी काटोल मार्गावरील शासकीय मुलींचे बालगृह, सरस्वती शासकीय महिला वसतिगृह (मतिमंद), शासकीय महिला करुणा वसतिगृह तसेच शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातील व्यवस्थेचा माहिती घेतली.
यावेळी शासकीय मुलींच्या बालगृहाच्या अधीक्षिका अंजली निंबाळकर, शासकीय करुणा महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका शीला मांडवेकर, शासकीय मुलांच्या निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका नम्रता चौधरी, अनिरुद्ध पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा गहरवार, परिविक्षा अधिकारी मनीषा आंबेडा़रे, डी. टी. कळंबे, समुपदेशक कविता इखार, लता कांबळे, व्ही.व्ही. दुधकवर, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, प्रशांत व्यवहारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बालविकास संरक्षण अधिकारी सचिन जाधव आदी उपस्थित होते.
मुलींच्या शासकीय बालगृहामध्ये 6 ते 18 वर्ष वयोगटातील 70 मुली वास्तव्यास आहेत. येथील मुलींना सद्य:स्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. मानसिक आधार तसेच मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन गृह, मनोरंजन कक्षाची सोय आहे.
सरस्वती शासकीय महिला वसतिगृह (मतिमंद) याठिकाणी वय वर्ष 18 ते पुढील वयाच्या 79 मतिमंद तसेच मानसिक आजारी महिला वास्तव्यास असून त्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करण्यात येते, अशी माहिती अधीक्षिका अंजली निंबाळकर यांनी दिली.
शासकीय करुणा महिला वसतिगृहात अनैतिक संबंधात ओढल्या गेलेल्या, परित्यक्ता, निराश्रित महिलांना आधार देवून सुरक्षा पुरवली जाते. तसेच, त्यांचे पुनर्वसन देखील करण्यात येते.
शासकीय मुलांच्या निरीक्षण गृहामध्ये गुन्हेगारी वृत्तीमध्ये अडकलेल्या 18 वर्षांखालील मुलांना ठेवण्यात येते. शिवाय निरीक्षण गृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांना स्वत:चा उदरनिर्वाह करता यावा, यासाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती अधीक्षिका नम्रता चौधरी यांनी दिली. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *