Home रानशिवार सत्य नेहमीच प्रकट होते…म. गांधी जयंती विशेष

सत्य नेहमीच प्रकट होते…म. गांधी जयंती विशेष

76

संत राजिन्दर सिंहजी महाराज

 

ज्यांना अध्यात्मिक प्रगती करायची आहे, ते सत्याचा नेहमीच आदर करतात. दैनंदिन जीवनात आपल्याला सत्य स्वीकारावे की असत्य याची निवड करावी लागते. बºयाच लोकांचा असा गैरसमज असतो की आपण काहीही चूक केली, खोटं बोलून धोका दिला, तर त्याचा थांग पत्ता लागणार नाही. म्हणून लोक स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा एखाद्या गोष्टीपासून अलिप्त राहण्यासाठी असत्याचा मार्ग अवलंबतात; पण आपण हे विसरतो की सत्य हे कुठल्या न कुठल्या प्रकारे, तत्काळ किंवा कालांतराने उघड होतेच किंवा प्रकाशात येतेच. जर आपण आपल्या प्रत्येक व्यवहारात सत्याची कास धरली, तर आपल्याला कोणापासूनही घाबरण्याची किंवा काही गोष्टी लपवण्याची गरज रहात नाही. त्यामुळे लोक आपला आदर करतात. आपल्यावर विश्वास ठेवतात आणि जेव्हा आपण अध्यात्मिक साम्राज्यात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मन:पटलावरील मळभ दूर झालेले असते.

आपण खोटं बोलतो, तेव्हा आपल्याला आधीचे एक खोटं लपवण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. आणि इतकं सर्व खोटं लक्षात ठेवणं आपल्याला फार कठीण असतं. सत्य एकच असते आणि ते लक्षात ठेवणे सोपे असते. असत्य हे एक जाळ्याप्रमाणे असते. त्यात आपण गुंतत गेलो की गुंततच जातो. त्याचा प्रत्येक धागा व्यवस्थित राहील आणि तो तुटणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. जेव्हा आपलं असत्य जगासमोर येईल असे वाटते, तेव्हा झोपही आपली शत्रू होते. या मनस्थितीत घाबरून-घाबरून जगण्यापेक्षा असत्याला पूर्णविराम देऊन, सत्याचा मार्ग स्वीकारावा. जेणेकरून शांत मनाने आपण ध्यान-अभ्यास करू शकू.

अध्यात्मिक विकासाची निर्भरता ही मानसिक द्विधा व मोहापासून अलिप्त अशा मनाच्या स्थिरतेवर अवलंबून असते. असत्य ही एक अशी अनावश्यक द्विधा आहे की ज्यामुळे आपली मन:शांती, एकाग्रता व वेळ यांचा भंग होतो, जी आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्यासाठी आवश्यक असते. आपण खोटं बोलण्या अगोदर हा विचार करायला हवा की आपण शांततामय जीवन जगावे आणि परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर होऊन मार्गक्रमण करावे.

*****