रेस्टॉरंट्स, बार सुरू करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर

(Last Updated On: October 4, 2020)

मुंबई : राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंट्स आणि बार सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगिन अगेन अंतर्गत येत्या ५ आॅक्टोबरपासून ५० टक्केपेक्षा जास्त नाही इतक्या क्षमतेने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंट्स आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंट्स, (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिट्स / आऊटलेट्स हॉटेल / रिसॉर्ट्स / क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे
कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी. संबंधित आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी उपलब्ध करावेत. डिजिटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी. रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी. काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे. शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्य असल्यास दारे, खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा. एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निजंर्तुकीकरण करण्यात यावे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्यात. क्यूआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेन्यूकार्ड उपलब्ध करावे. कापडी नॅपकीनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकीनचा वापरावेत. दोन टेबलांमध्ये किमान 1 मीटर अंतर ठेवावेत आदी सूचनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *