Home उपराजधानी नागपूर प्राण्यांचे संवेदनशीलपण जपावे… World Animal Day

प्राण्यांचे संवेदनशीलपण जपावे… World Animal Day

98

अभिवृत्त न्यूज ब्युरो   

आज जागतिक प्राणी दिन. हा दिवस दरवर्षी 4 आॅक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. प्राण्यांशी आपला संबंध केवळ एका दिवसापुरता नसतो़ केवळ शेतकºयांचा प्राण्यांशी संबंध असतो, असा गैरसमज होता कामा नये़ कारण पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचा जनावरांशी, पाळीव प्राण्यांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येत असतो. जसा मानव तसाच प्राणी़ त्यामुळे प्राणी दिनाला एका विशिष्ट दिवसात गुंडाळणे योग्य नाही. या दिवशी प्राणी हक्क आणि त्यांच्या कल्याणाशी संबंधित विविध कारणांचा आढावा घेण्यात येतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्राणी दिनानिमित्त जनतेला चर्चेत सामील करून जनावरांचे संगोपन, निगा-पालन, त्यांच्यासोबतचा क्रूर व्यवहार, हक्कांचे उल्लंघन आदी विविध विषयांवर जनजागृतीचा प्रयत्न केला जातो.

शिवाय हा दिवस राष्ट्रीयत्व, विश्वास, धर्म आणि राजकीय विचारसरणींना बाजूला सारून विविध मार्गांनी जगभर साजरा केला जातो. व्यक्ती, गट आणि संघटनांच्या पाठिंब्याने आणि सहभागाने जगभरात पशु कल्याण मानक सुधारण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. प्राणी कल्याण दिनानिमित्त जनावरांचे जीवनमान सुधारण्यासाठी जागतिक प्राणी कल्याण अभियान, सुरक्षित निवारा, त्यांचे आरोग्य संवर्धन, पोषक आहार आदींसाठी निधी संकलन आदी कार्यक्रम आयोजित केले जाते.

इतिहास…     

जागतिक प्राणी दिन हा 24 मार्च 1925 रोजी जर्मनीच्या बर्लिनमधील स्पोर्ट्स पॅलेसमध्ये स्त्री रोगतज्ज्ञ हेनरिक झिमर्मन यांनी पहिल्यांदा आयोजित केला होता़ या कार्यक्रमात सुमारे पाच हजार लोकांनी सहभाग घेतला होता; परंतु 1929 पासून हा दिवस 4 आॅक्टोबर रोजी साजरा करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ही चळवळ जर्मनीमध्ये प्रारंभ झाली आणि नंतरच्या काळात हळूहळू जगभर पसरली. 1931 मध्ये इटलीतील फ्लोरेन्स याठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण परिषद आयोजित पार पडली आणि दरवर्षी 4 आॅक्टोबरला आंतरराष्ट्रीय प्राणी दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर युनो अर्थात संयुक्त राष्ट्रांनी नियम आणि मार्गदर्शकतत्त्वांनुसार अनेक मोहिमा सुरू केल्या. संयुक्त राष्ट्रांनी जाहीरपणे जाहीर केलेल्या घोषणेत वेदना आणि दु: खाच्या संदर्भात प्राण्यांना ‘संवेदनशील जीव’ म्हणून घोषित केले गेले.

जागतिक प्राणी दिनाचा उद्देश पशुंविषयी कल्याण मानक सुधारणे आणि व्यक्ती व संघटनांचे सहकार्य मिळविणे असा आहे. या दिवसाचा मूळ हेतू म्हणजे विलुप्त वा दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांचे संरक्षण करणे आणि मानवांशी त्यांचे संबंध दृढ करणे असा आहे. प्राणी दिन साजरा करण्याचा हाही एक हेतू आहे, की प्रत्येक प्राणी एक अनोखा संवेदनशील जीव आहे आणि म्हणूनच करुणा आणि सामाजिक न्यायासाठी तो पात्र आहे. या धारणेवर प्राणी दिनी कार्य करण्यात येते. कारण यापूर्वी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्राण्यांवर दुय्यम स्वरुपाची वागणूक दिली जात होती. त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत होते, जे अक्षम्य चुकीचे होते.

आताशा दिवसांगणिक प्राण्यांची सुरक्षितता, आहार, आरोग्य आदींबाबत जागृतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,जे एक सकारात्मक पाऊल आहे. आता जगभरात त्या त्या देशांच्या सरकारसोबत अनेक खासगी संस्था, व्यक्ती पुढे आल्या असून, मोठ्या पातळीवर कार्य होत आहे. मात्र, अद्यापही बराच पल्ला गाठावा लागणार आहे.

*****