Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य जयश्री गडकरांचा अद्वितीय सौंदर्याभिनय… CINEdeep

जयश्री गडकरांचा अद्वितीय सौंदर्याभिनय… CINEdeep

366

अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनयाने रसिकांच्या मनावर पाच दशके अधिराज्य गाजवणाºया अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म २१ मार्च १९४२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सदाशिवगड येथे सामान्य कोकणी कुटुंबात झाला होता. मूळच्या मीना, नंतर जया, जयश्री या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला आल्यामुळे त्यांचे पुढचे शिक्षण मुंबईला झाले. कॉलेज शिक्षण मात्र झाले नाही.
नृत्य-गायनाची आवड असल्यामुळे कलाक्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा होता. लहान असताना चोरून चित्रपट पाहिल्याच्या आठवणी जयश्री गडकर यांनी त्यांच्या ‘अशी मी जयश्री’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. बालपणीच त्यांचे नृत्याचे शिक्षण सुरू झाले. त्या गोपीकृष्णांकडून कथ्थक शिकल्या. पुढे त्यांनी गायनाचेही धडे घेतले.
मुळात जयश्री यांनी बालकलाकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. १९५५ साली व्ही. शांताराम यांच्या झिनक झनक पायल बाजे’ मधील एका गाण्यात कोरसमध्ये नृत्य करणाºया तरुणींपैकी जयश्री गडकर एक होत्या. त्यावेळी त्यांचे वय होते केवळ १३ वर्षे. १९५६ साली ‘दिसत तसं नसतं’ मध्ये अभिनेते राजा गोसावी यांच्यासोबत जयश्री यांनी काम केले होते.त्यांना संधी दिली होती दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी.


याच काळात रशियाचे नेते क्रुश्चेव भारत भेटीवर आले असताना पुण्यात एका कार्यक्रमात त्यांच्या स्वागतासाठी जयश्री गडकर यांनी ‘घनश्याम सुंदरा…’ आणि ‘लटपट लटपट तुझं चालणं…’ गाण्यांवर नृत्य सादर केले. छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांची छायाचित्रे काढून त्यांच्या स्टुडिओमध्ये लावली. ही छायाचित्रे दिनकर पाटील यांच्या बघण्यात आली. त्यामुळे ‘दिसतं तसं नसतं’ मध्ये जयश्री गडकर यांना नृत्याची संधी मिळाली होती. दरम्यान, राजा परांजपे यांनी जयश्री गडकर यांना पाहिले आणि ‘गाठ पडली ठका ठका’मध्ये नायिकेची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहले नाही. सूर्यकांत हे नायक होते. पुढे ही जोडी सांगत्ये ऐका, लग्नाला जातो मी, पंचारती, मल्हारी मार्तंड, लाखात अशी देखणी, साधी माणसं, सून लाडकी या घराची आदी चित्रपटांतून एकत्र झळकली. या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती.
सूर्यकांत यांच्याशिवाय अभिनेते राजा गोसावी यांच्यासोबतही जयश्री यांची आॅन स्क्रीन जोडी जमली होती. राजा गोसावींसोबत तब्बल नऊ चित्रपटांत जयश्री यांनी काम केले होते. ‘सांगत्ये ऐका’मधील ‘बुगडी माझी सांडली गं…’ ही लावणी अतिशय गाजली होती.
तसेच, ‘साधी माणसं’ मधील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहून दे…’ ‘माळ्याच्या मळ्या मंधी’ ही गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली. मराठी चित्रपटांत सोज्वळ आणि तमाशाप्रधान भूमिका साकारून त्यांनी अष्टपैलू अभिनयाचे दर्शन घडवले होते.

लोकप्रिय चित्रपट असे                                                                                                        सौभाग्यदान, लव्ह कुश, मालमसाला, मुंबई ते मॉरिशस,अमिरी गरिबी, कानून अपना अपना, ईश्वर, भटक भवानी, नजराना, पूर्णसत्य, बिजली, कृष्ण-कृष्ण, वीर भीमसेन, मास्टरजी, नया कदम, सिंदूर का दान, सुलगते अरमान, आव्हान, जियो तो ऐस जियो, सून माझी लक्ष्मी, कडकलक्ष्मी, गायत्री महिमा, महिमा श्री राम की, बजरंगबली, एक गाव की कहानी, बालक ध्रुव, हर हर महादेव, किसान और भगवान, आई उदे गा अंबाबाई, महासती सावित्री, हरि दर्शन, नागपंचमी, कसं काय पाटील बरं हायं का, श्री कृष्ण लीला, तुळशी विवाह, लाखात अशी देखणी, सुभद्रा हरण, सुख आले माझ्या दारी, बाप माझा ब्रह्मचारी,मानिनी, सारंगा, ससुराल,अवघी संसार, मदारी, सांगते ऐका, सावित्री, सुबह का तारा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जिव्हाळा, सून लाडकी या घरची, आलिया भोगासी, अवघाचि संसार, घरकुल, सांगू कशी मी, चांदोबा चांदोबा भागलास का, दरम्यान, जयश्री यांना मानिनी, वैजयंता, सवाल माझा ऐका आणि साधी माणसं या चित्रपटांतील अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले.
१९७५ साली अभिनेते बाळ धुरी यांच्यासोबत जयश्री विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतरसुद्धा त्यांनी अभिनय सुरू ठेवला. बाळ यांच्यासोबतही त्यांनी काही चित्रपटांत भूमिका केल्या. अशी असावी सासू, हे दान कुंकवाचे, मुंबई ते मॉर्शिअसमध्ये ही जोडी एकत्र झळकली.


‘ससुराल’,‘लव कुश’, ‘डिटेक्टिव’, ‘संपूर्ण महाभारत’,‘जियो तो ऐसे जियो’ हिंदी चित्रपटांतूनही जयश्री यांनी भूमिका साकारल्या. केवळ मराठी, हिंदीतच नव्हे तर गुजराती, तामिळ, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले. साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटांसाठी सलग तीन वर्षे राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. जयश्री गडकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रातसुद्धा यशस्वी वावर केला.‘अशी असावी सासू’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘अशी मी जयश्री’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. मराठमोळ्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकू न घेणाºया जयश्री गडकर यांची आत्मकथा वसंत भालेकर यांनी शब्दांकित केली आहे . आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया जयश्री गडकर यांनी २९ आॅगस्ट २००८ रोजी जगाचा कायमचा निरोप घेतला.
मराठी-हिंदी चित्रपटांतील अभिनयसमाज्ञीला मानाचा मुजरा…

(लेखात वापरलेली छायाचित्रे गुगलवरून साभार)

*****