Home प्रादेशिक विदर्भ खादी, गोरस पाक उद्योगातून मोठी रोजगार निर्मिती : गडकरी

खादी, गोरस पाक उद्योगातून मोठी रोजगार निर्मिती : गडकरी

39

वर्धा : एमगिरीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून वर्धा जिल्ह्यातील किमान १० हजार लोकांना काम देऊ शकू, असा प्रकल्प तयार करावा. वर्ध्यात़ील खादी, गोरस पाक यांचे अधिक प्रमाणावर उत्पादन आणि ब्रँडिंग केल्यास आणि निर्यात केल्यास या क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते, असा विश्वास केंद्रीय लघु,सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास व संभावना जनजागृती कार्यशाळेत मंत्री गडकरी यांनी आॅनलाइन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, एमगिरीचे संचालक आर. के. गुप्ता, आमदार पंकज भोयर, सल्लागार परिषदेचे सदस्य श्री. काळे, मगन संग्रहालय संचालक विभा गुप्ता उपस्थित होत्या.
गावातील शेतकरी, मजूर, बेरोजगार युवक यांना गावातच रोजगार देणे आणि गाव स्वयंपूर्ण करणे हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. त्यासाठी वर्धेत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करू शकणारे तंत्रज्ञान विकसित करणे आणि ते गावापर्यंत पोहचवणे यासाठी एमगिरीची स्थापना करण्यात आली. एमगिरी ने ग्रामीण भागात उद्योगाला चालना मिळेल असे विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे मात्र ते ग्रामीण भागापर्यंत पोहचले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी एमगिरीने पुढाकार घ्यावा़ वर्धेतील ड्रायपोर्ट सुरू झाल्यास जिल्ह्यातून 2 हजार कोटी रुपयांची भाजी निर्यात करता येईल.
पालकमंत्री श्री केदार यांनी कार्यक्रमाला आॅनलाइन मार्गदर्शन केल्याबाबत नितीन गडकरी यांचे आभार मानले. एमगिरी ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा आणि त्यांच्या जवळील ज्ञानाचा विस्तार केला तर ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पनात वाढ होण्यास मदत होईल. आपण विकसित केलेले संशोधन लोकांपर्यंत पोहचवावे, असे आवाहन केले. तसेच जिल्ह्यात सेंटर आॅफ एक्सलंस आणि रिसोर्स सेन्टरचा केंद्र शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती मंत्री. गडकरी यांना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here