महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपला राष्ट्रीय पुरस्कार

(Last Updated On: October 6, 2020)

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून मुंबई येथील दोन स्टार्टअप [ maharashtra start up] वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड (आरोग्य सेवा श्रेणी) आणि तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (नागरी सेवा श्रेणी) यांना सर्वोत्तम कामगिरी करत मानाचा राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार पटकावला आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या वतीने येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात आज राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार-२०२० चा निकाल जाहीर झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि विभागाचे सहसचिव अनिल अग्रवाल उपस्थित होते. वाणिज्य व उद्योग विभागाचे राज्यमंत्री सोम प्रकाश हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
देशामध्ये रोजगाराला चालना देण्यासाठी व नवसंकल्पना प्रत्यक्षात उतरवून नाविन्यपूर्ण उत्पादने व पर्यायी सेवा व्यवस्था निर्माण व्हावी या उद्देशाने पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. एकूण १२ श्रेणींमध्ये विविध ३५ गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपचा यात समावेश आहे.
आरोग्य सेवा श्रेणीमध्ये एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातील २१ राज्य व केंद्र्रशासित प्रदेशांमधून एकूण२४९ स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी स्पर्धा होती. यामधून आरोग्य सेवा पुरवण्याच्या गटात मुंबई येथील वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ला सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या संस्थेने रुग्णांसाठी मॉनिटरिंग डॅशबोर्ड तयार केले असून या माध्यमातून रुग्णांना सतर्कता संदेश पुरविण्यात येतात. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कार्यरत या सुविधेच्या माध्यमातून रुग्णांना गुणात्मक सेवा उपलब्ध झाली आहे.
तरलटेक सोल्युशन्सला नागरी सेवांमधील सर्वोत्तम स्टार्टअपचा मान
नागरी सेवा श्रेणीमध्येही एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातून सहभागी एकूण १३७ स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी चुरस होती. यामधून जल व जल जाळे निर्माण करण्याच्या गटात मुंबई येथील तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अन्य साधनांअभावी हातपंपावर अवलंबून असणाºया लोकांसाठी या संस्थेने हातपंप विकसित करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात नाविन्यपूर्ण कार्य केले आहे.
५ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून विजेत्या स्टार्टअपला आपल्या प्रकल्पाबाबत कामाची मागणी नोंदविण्यासाठी संबंधित सार्वजनिक प्राधिकृत अधिकारी, कॉपोर्रेट संस्थांपुढे कामाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *