आॅक्सिजन पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होणार : सुभाष देसाई

(Last Updated On: October 6, 2020)

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारत असून पुढील १५ दिवसांत उद्योगांना लागणारा आॅक्सिजन टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. दरम्यान, कोरोना रुग्णांसाठी आॅक्सिजनची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज मंगळवारी आॅक्सिजन पुरवठादार व उद्योजक यांच्यासोबत आॅनलाईन बैठकी ते ेबोलत होते. एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, गॅस असोशिएशनचे अध्यक्ष साकेट टिकू यांसह उद्योजक उपस्थित होते.
राज्य शासनाने महिनाभरापूर्वी कोविड रुग्णांसाठी ८० टक्के आॅक्सिजन राखीव ठेवण्याबाबत आदेश काढले. यामुळे उद्योगांना आॅक्सिजनची मोठी टंचाई जाणवत आहे. असे असले तरी महिनाभराच्या कालावधीत कोरोनाची स्थिती सुधारत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयाप्रमाणे उद्योगांनाही आॅक्सिजन सुरू राहण्यासाठी आढावा घेतला जाईल. आरोग्य विभागाचा आॅक्सिजन पुरवठा अविरत ठेवून उद्योगांना देखील मुबलक आॅक्सिजन पुरविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.
राज्यातील उद्योगांना ८७० मेट्रिक टन प्रतिदिन आॅक्सिजनची गरज आहे. त्यापैकी ६०० मेट्रिक टन आॅक्सिजन उद्योगांना लागतो. राज्यात सध्या एक हजार मेट्रिक टन आॅक्सिजनची निर्मिती होत आहे. नवीन उद्योगांतून पाचशे मेट्रिक टन आॅक्सिजन निर्मिती होऊ शकते. आपली उत्पादन क्षमता १३०० मेट्रीक टन इतकी आहे. त्यामुळे उद्योगांनी आॅक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना उद्योगमंत्र्यांनी केली.
दरम्यान, कोरोना रुग्णांची गरज जसजशी कमी होईल, तसतशी उद्योगांसाठी आॅक्सिजनची उपलब्धता वाढेल. मात्र, याक्षणी प्राधान्य रुग्ण उपचारांनाच देण्यात येत आहे. ते प्राधान्य कायम राहील, असेही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *